- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्याची दाणादाण उडविणाऱ्या परतीच्या पावसाबरोबरच शासन नियमातील जाचक अटीही शेतकऱ्याच्या मूळावर उठल्या आहेत. महसुल विभागाच्या लेखी जिल्ह्यात ४६ पैकी सात महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद असल्याने पंचनामे सुरू झाले तर उर्वरीत ३९ मंडळात अतिवृष्टी नसल्याने तेथील पंचनाम्याला सुरूवात होऊ शकली नाही.यंदाही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुरता खचून गेला आहे. यावर्षी जिल्ह्यात सोयाबीनची सर्वाधिक अर्थात २ लाख ९३ हजार हेक्टरवर पेरणी झाली. ११ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात सर्वदूर परतीच्या पावसाने सोयाबीनसह कपाशी व अन्य पिकांचे अतोनात नुकसान केले. शेतात सोंगून ठेवलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंचनामे आवश्यक आहेत. दुसरीकडे ११ ऑक्टोबरला जिल्ह्यातील केवळ सात महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने तेथे पंचनामे सुरू झाले. प्रशासनाच्या लेखी ३९ महसूल मंडळात अतिवृष्टी नसल्याने तेथे पंचनाम्याला सुरूवात होऊ शकली नाही. त्यामुळे या महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला नाही, अशा शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.