वाशिम तालुका पेपरलेस व्हावा, त्यायोगे प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी पेपरलेस कामकाजाचे महत्त्व प्रशिक्षकांनी सांगितले. ग्रामपंचायतमार्फत आवश्यक असलेली माहिती तत्काळ मिळाली पाहिजे. अनेक वेळा कागदपत्रे जमा करण्यासाठी ग्रामसेवकांचा बराच वेळ खर्ची जातो. परंतु प्रशासनाच्या निडली अॅपचा उपयोग करताना केवळ एका क्लिकच्या माध्यमातून सर्व कागदपत्रे मिळून त्यांचा वेळ वाचू शकतो. यासाठी प्रशिक्षक भुतडा यांनी निडली अॅपच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाज कसे करावे याचे प्रात्यक्षिक उपस्थितांना करून दाखविले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला पं.स. गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे, वाशिम पंचायत समितीमधून सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरद गोदारा, तालुकाध्यक्ष दीपक खडसे, संगणक परिचालक संघटनेचे वाशिम अध्यक्ष शेखर हिरगुडे यांची उपस्थिती होती. तर ग्रामसेवक संघटनेचे वाशिम अध्यक्ष गणेश इढोळे, तालुका व्यवस्थापक नंदू इढोळे यांच्यासह तालुक्यातील अनेक सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व संगणक परिचालक यांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता.
--------
पुणे येथील प्रशिक्षकांचे मार्गदर्शन
सर्व प्रशासकीय काम पेपरलेस होण्यासह जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे यांच्या पुढाकारातून आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात पुणे येथील प्रशिक्षक भुतडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतानाच प्रशासनाच्या गुगल मिटद्वारे निडली अॅपच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले.