वाशिम - यंदाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून, नर्सरीपासून ते १० वीपर्यंतच्या वर्गासाठी लागणारे विविध शालेय साहित्य खरेदीसाठी पालक, विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. यामुळे जिल्हाभरातील शालेय साहित्य, वह्या, पुस्तकांच्या दुकानांत गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यंदाच्या शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून प्रारंभ झाला आहे. प्रामुख्याने खाजगी शाळा, महाविद्यालयांचे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून, विद्यार्थ्यांना नव्या सत्रासाठी पाठ्यक्रमाची पुस्तके आणि इतर साहित्य खरेदी करावे लागत आहे. यंदा काही वर्गांचा अभ्यासक्रम बदलल्याने नव्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी म्हणून सुरुवातीलाच पुस्तके जवळ असणे आवश्यक आहे. या कारणामुळे विविध ठिकाणच्या शालेय साहित्य व पुस्तक विक्रीच्या दुकानांत पालक, विद्यार्थ्यांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्याशिवाय स्कूल बॅगच्या दुकानांतही गर्दी होत आहे. नर्सरी ते १० वीपर्यंचे विद्यार्थी व पालक या दुकानांत खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. दरम्यान, यंदा स्कूल बॅगसह वह्या आणि इतर साहित्याचे दर मागील वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढल्याने पालकांच्या खिशाला मात्र त्याची झळ सोसावी लागत आहे.