वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे तब्बल ५५ दिवस बंद असलेली बससेवा अनलॉकच्या टप्प्यात ७ जूनपासून पूर्ववत झाली. बसमधून प्रवास करण्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे; तर दुसरीकडे रेल्वेच्या प्रवासाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते.
दुसऱ्या टप्प्यात मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले. त्यामुळे बसेसच्या प्रवासावरही मर्यादा आल्या. कडक निर्बध लागू होण्यापूर्वी दोन दिवस अगोदरच एसटी महामंडळाची ग्रामीण भागातील सेवा बंद केली होती. एसटीची सेवा फक्त अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठीच होती. मात्र त्याला प्रतिसाद अतिशय अल्प मिळत होता. अनेक बसेस गेल्या दोन महिन्यांपासून जागेवरच उभ्या होत्या. बससेवा बंद असल्याने महामंडळाला लाखोंचा फटका बसला. आता अनलॉकच्या टप्प्यात कोरोनाचे साखळदंड तोडून एस.टी. सुसाट धावायला लागली आहे. जिल्ह्यांतर्गत प्रवासी सेवेबरोबर परजिल्ह्यातही एस.टी. धावत आहे. एसटीच्या प्रवासाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे; तर दुसरीकडे मात्र वाशिम येथून रेल्वेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून बहुतांश प्रवासी सावधगिरी बाळगत आहेत; तर काहीजण मात्र मास्कचा वापर करीत नसल्याचेही दिसून येते.
००००००
वाशिम आगाराच्या रोज फेऱ्या ४०
....
रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या १५००
...
धावणाऱ्या रेल्वेची संख्या ८
....
प्रवासी १५००
...
बसने अकोल्याला गर्दी
अनलॉकच्या टप्प्यात पूर्ण क्षमतेने बसेसला परवानगी मिळाली आहे. वाशिम ते अकोला या मार्गावरील प्रवासाला प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. अकोला जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी असल्याचे दिसून येते. त्या तुलनेत ग्रामीण भागातील बसफेऱ्यांना ५० टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.
००००००
रेल्वेला अपेक्षित प्रतिसाद नाही
वाशिम येथील स्थानकावरून रेल्वेने प्रवास करण्याला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे गत तीन दिवसांत दिसून आले. साधारणत: ६० ते ७० प्रवासी वाशिम येथून रेल्वेने प्रवास करीत असल्याची माहिती आहे. अकोला जाण्यासाठी सर्वाधिक पसंती आहे.
००००००
अत्यावश्यक कामासाठीच प्रवास
कोट बॉक्स
एसटीपेक्षा रेल्वेचे प्रवास भाडे अत्यल्प आहे. अकोला जाण्यासाठी बसपेक्षा रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतो. अत्यावश्यक काम असेल तरच प्रवास केला जातो.
- दत्ता वानखेडे, रेल्वे प्रवासी
.....
कोरोनाकाळात शक्यतो प्रवास टाळण्याचा प्रयत्न आहे. अत्यावश्यक काम असेल तरच अकोला किंवा अन्य ठिकाणी रेल्वेने प्रवास केला जातो.
- योगेश उबाळे, रेल्वे प्रवासी.
......................
ग्रामीण भागातही बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. अत्यावश्यक काम असेल, तर खबरदारी घेऊन बसने प्रवास करतो.
- शिवराम कांबळे, बस प्रवासी
....
कोरोनाकाळात आवश्यक ती खबरदारी घेतली जाते. कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घेऊन अत्यावश्यक काम असेल तरच एसटीने प्रवास केला जातो.
- मधुकर भगत, बस प्रवासी
०००००००००००
वाशिम आगारातून सध्या १० बसेस धावत आहेत. दिवसभरात ४० फेऱ्या होत असून, प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. दररोज सरासरी १५०० प्रवासी प्रवास करतात.
- विनोद इलामे,
आगारप्रमुख, वाशिम
.....
वाशिममार्गे सध्या ८ रेल्वे धावत आहेत. रेल्वे प्रवासाला प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. रेल्वे स्थानकावर आवश्यक ती खबरदारी घेतली जाते.
एम. टी. उजवे,
- रेल्वे स्टेशन मास्तर, वाशिम
०००००००००००००