वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासकीय पातळीवरून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, प्रवासी वाहतुकीसाठी वाहनाच्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के वाहतुकीला परवानगी देण्यात आली असून, एस. टी.तील प्रवाशांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० रुपये दंड आकारला जावा, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी १ एप्रिल रोजी दिले आहेत. हे आदेश ३० एप्रिल २०२१पर्यंत लागू राहतील.
एस. टी.सह सर्व प्रवासी वाहनांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग, निर्जंतुकीकरण, मास्कचा वापर आदी बाबींची खात्री संबंधित चालक व वाहकाने करावी. खासगी प्रवासी वाहनात या बाबींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास संबंधित खासगी वाहन कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येईल. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील खासगी प्रवासी वाहनांची आकस्मिक तपासणी करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दर आठ दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवाशांनी नियमांचे उल्लंघन केल्यास प्रवाशांकडून ५०० रुपये दंड आकारण्यात यावा. याकरिता डेपो व्यवस्थापकांनी आवश्यक ती व्यवस्था आपल्या स्तरावरून करावी. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल दर आठ दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
.................
बाक्स :
आठवडा बाजार, जनावरांचे बाजार बंद
जिल्ह्यात ठोक भाजी मंडई यापुढे सकाळी ३ ते ६ या कालावधीत सुरू राहू शकेल. भाजी मंडईमध्ये किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश राहील. जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार, जनावरांचे बाजार मात्र बंद राहतील.
............
सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना बंदी
गर्दी होणारे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. ऑडिटोरियम अथवा तत्सम आस्थापनेत अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम घेता येणार नाहीत. या नियमांचे उल्लंघन करणारी प्रतिष्ठाने, आस्थापना कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येतील. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना, प्रतिष्ठान यांच्या मालकांविरुद्ध एकावेळेस १० हजार रुपये दंड आकारून आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
..................
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड
सार्वजनिक ठिकाणी सरकारी, निमसरकारी व खासगी आस्थापना, कार्यालयांत, प्रवासादरम्यान नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछाचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. याचे उल्लंघन झाल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी व कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास १ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
..............
तातडीच्या कामाशिवाय सरकारी कार्यालयात प्रवेश नाही
सरकारी, निमशासकीय कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी नागरिकांनी अतिशय तातडीच्या कामासाठीच कार्यालयांमध्ये यावे. अतिशय तातडीच्या कामाशिवाय नागरिकांना सरकारी कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही, असे आदेशात नमूद आहे.
.............
लग्न समारंभाला ५०, अंत्यविधीला २० व्यक्तिंना मुभा
लग्न समारंभाकरिता ५० व्यक्तिंना परवानगी राहील. त्याकरिता नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रात संबंधित नगरपालिका, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांची तसेच ग्रामीण भागाकरिता तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. अंत्यविधीकरिता २० व्यक्तिंना उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे.
............
घरांवर लागणारं कोविड रुग्ण फलक
गृह अलगीकरण मंजूर केलेल्या रुग्णाच्या घराच्या दर्शनी भागात १४ दिवस कोविड रुग्ण असल्याबाबतचा फलक लावण्यात यावा जेणेकरून इतर व्यक्तिंना त्याठिकाणी कोविडबाधित रुग्ण असल्याचे समजेल. कोविडबाधित रुग्णाच्या हातावर गृह अलगीकरण शिक्का मारण्यात यावा तसेच रुग्णाच्या कुटुंबियांनी विनाकारण बाहेर फिरू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबियांना तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येणार आहे.