लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : दीड वर्षापूर्वी मुंगळा ते कळंबेश्वर मार्गावर २० लाख रुपये खर्चून पुलाचे बांधकाम करण्यात आले. अवजड वाहतुकीमुळे दीड वर्षातच या पुलावर खड्डे पडल्याने वाहतुकीत व्यत्यय निर्माण होत आहे.मुंगळा ते कळंबेश्वर या मार्गावर असलेल्या नदीपात्रावर दीड वर्षापूर्वी नव्याने पूल बांधकाम करण्यात आले. या बांधकामात सुमार दर्जाच्या साहित्याचा वापर होत असल्याची तक्रार त्यावेळी बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. मात्र, याकडे लक्ष देण्यात आले नाही. आजरोजी या पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाचे बांधकाम करताना त्याखालुन पाणी वाहुन जाण्यासाठी मोठमोठे सिमेंट पाईप टाकण्यात आले. हे पाईप पुर्णत: फुटले आहेत. या पुलावरून क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहतूक होत आहे. समृद्धी महामार्गासाठी लागणाºया साहित्याची वाहतूक करणारी मोठमोठी वाहने याच पुलावरून धावत आहेत. प्रत्यक्षात कमी क्षमता असलेल्या पुलावरुन मोठमोठी वाहने जात असल्याने पुलावर खड्डे पडलेआहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी पावसाळ्यापूर्वी पुलावरील खड्ड्यांची डागडूजी करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
प्रत्यक्षात कमी क्षमतेच्या पुलावरून अवजड वाहतूक होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे मोठमोठे ट्रक जात असल्याने हा पूल क्षतिग्रस्त होऊ शकतो याबाबत आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आह. अद्याप याची दखल घेण्यात आली नाही. अवजड वाहतूक दुसरीकडून वळती करावी आणि पूल दुरुस्त करून द्यावा अशी आमची मागणी आहे.- श्याम बढे, सदस्य जिल्हा परिषद