लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातून जात असलेल्या महामार्गावर मोठया प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून या खड्डयांमुळे वाहनधारकांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत थातूर -मातूर खडयांमध्ये मुरुम टाकून दुरुस्ती करण्यात आली होती मात्र ती जडवाहनांमुळे निघून गेल्याने पुन्हा खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्डयांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.सद्यस्थितीत पावसाळयाचे दिवस असल्याने वाशिम - अकोला महामार्गावर पडलेल्या खड्डयांमध्ये पाणी साचत आहे. खड्डा किती खोल आहे याची कल्पना पाण्यामुळे वाहनधारकांना होत नसल्याने त्यातून वाहन गेल्यास वाहनाला जबर मार लागून वाहनाचे नुकसान होत आहे. तसेच अनेक जणांचे किरकोळ अपघात झाल्याच्या घटना सुध्दा या खड्डयामुळे झाला आहे. हिच परिस्थिती हिंगोली महामार्गावरही दिसून येत आहे. गतवर्षी पावसाळयापूर्वी महामार्गाची रस्त्यांची डागडुजी करण्यात आली होती. यावर्षी अकोला महामार्गावर खड्डे नसल्याने डागडुगी करण्याचे काम पडले नाही, परंतु हिंगोली महामार्गावर काही ठिकाणी असलेल्या खड्डयांची दुरुस्ती करण्यात न आल्याने खडडे दिवसेंदिवस मोठे होत आहेत. या मार्गावरुन जड वाहने मोठया प्रमाणात धावतांना दिसून येतात.जड वाहनांमुळे खड्डे मोठया प्रमाणात पडत आहेत. अकोला महामार्गावर शहरापासून पाच किलोमिटर अंतरावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खडयामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे बुजवून होणारे अपघात टाळावे अशी मागणी वाहनधारकांकडून केल्या जात आहे.
अकोला-वाशिम महामार्गावर खड्डेच खड्डे; अपघाताची शक्यता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 2:14 PM