वाशिम : सिकलसेल, थॅलेसिमिया यासारख्या दुर्मीळ आजाराच्या रुग्णांना दर महिन्याला रक्त द्यावे लागते. शासकीय रुक्तपेढीमध्ये रक्त उपलब्ध नसल्यास त्यांना रक्तदाते शोधावे लागतात. रुग्णाची परिस्थिती हलाखीची असल्यास दर महिन्याला असे रुग्ण रक्त विकत घेऊ शकत नाहीत. वेळेवर पैसे नसले किंवा रक्तदाते मिळाले नाहीत, तर असे रुग्ण प्राणासही मुकतात. दुर्धर आजारातील रुग्णांची ही परिस्थिती लक्षात घेऊन ८ मे रोज थॅलेसिमिया दिनापासून जिल्ह्यातील दुर्धर आजारातील रुग्णांना दर महिन्याला मोफत रक्तदाते पुरविण्याचा निर्णय येथील मोरया ब्लड डोनर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील दुर्धर आजारातील रुग्णांच्या नातेवाइकांनी ग्रुपच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन ग्रुपचे अध्यक्ष महेश धोंगडे यांनी केले आहे.
ग्रुपच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान मोहिमेची चळवळ राबविण्यात येत असून, विविध कार्यक्रम आणि उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना रक्तदान करण्याविषयी प्रोत्साहित केले जात आहे. ग्रुपच्या या सेवाभावी उपक्रमाला यश मिळत असून, आजपर्यंत विविध रुग्णालयांत भरती असलेल्या गंभीर रुग्णांना ग्रुपच्या माध्यमातून दानदाते उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
८ मे रोजी थॅलेसिमिया दिवस असतो. या आजारातील रुग्णांना, तसेच सिकलसेलमधील रुग्णांना दर महिन्याला एका विशिष्ट रक्तगटाच्या रक्ताची आवश्यकता आहे. वाशिम जिल्ह्यात थॅलेसिमिया आजाराचे अंदाजे २०० रुग्ण आहेत, तसेच इतर दुर्धर आजारांतील रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. अशावेळी या आजारांतील रुग्णांची परिस्थिती गरिबीची व हलाखीची असल्यास हे रुग्ण रक्तासाठी पैशाची सोय लावू शकत नाहीत. शिवाय गेल्या दोन वर्षांपासून उद्भवलेल्या महामारीमध्ये शासकीय रक्तपेढीमध्ये रक्तांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. अशावेळी त्यांना रक्तदाते शोधावे लागतात. वेळेवर अशा रुग्णांना रक्त न मिळाल्यास रुग्ण दगावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. रुग्णांची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन थॅलेसिमिया दिवसाचे औचित्य साधून रुग्णांना दर महिन्याला त्या- त्या गटाचे मोफत रक्तदाते मिळवून देण्याचा सेवाभावी संकल्पित निर्णय मोरया ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने घेण्यात आला आहे. यासाठी ग्रुपचे अध्यक्ष महेश धोंगडे, योगेश लोनसुने, अक्षय हजारे, अजय तोडकर, रवी धोंगडे, नाना देशमुख, राम लांडगे, स्वप्नील मनोज चौधरी, गोपाल इकडे, ऋषिकेश अंभोरे, शुभम शेळके, श्याम खोले, आकाश चव्हाण, निखिल देव, विकी गायकवाड, गणेश धोंगडे, अनिल धरणे, अक्षय धोंगडे, गजानन धोंगडे, विलास धोंगडे, दिनेश भिमटे, अविनाश राठोड आदी युवकांनी रक्तदानाच्या या पवित्र उपक्रमात आपला मोफत सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यातील रुग्णांच्या नातेवाइकांनी रक्तदात्यांसाठी स्थानिक राजस्थान कॉलेजजवळील ग्रुपच्या जनसंपर्क कार्यालयात किंवा ८८८८१२८४४० या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष महेश महेंद्र धोेंगडे यांनी केले आहे.