- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ न्यूमोनिया, विषमज्वराचे रुग्णही वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. दरम्यान, न्यूमोनियाग्रस्त जवळपास १५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने, खबरदारीचा प्रयत्न म्हणून न्यूमोनियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करावी, असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे.दरवर्षी साधारणत: पावसाळ्यात साथरोग उद्भवतात. यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य विभागासह जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे. पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, विषमज्वर आदी साथरोग उद्भवतात. जिल्ह्यात गत १५ दिवसांपासून हिवताप, डेंग्यू याबरोबरच न्यूमोनिया, विषमज्वराचे रुग्ण आढळून येत आहेत. सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही विषमज्वर, न्यूमोनियाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. न्युमोनियाच्या रुग्णांपैकी काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत असल्याने न्यूमोनियाच्या रुग्णांची कोरोना चाचणी व्हावी, असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे. दुसरीकडे न्यूमोनिया रुग्णांची शक्यतोवर कोरोना चाचणी केली जाते, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास सोनटक्के यांनी स्पष्ट केले.दिवसातून ओपीडीच्या साधारणत: ५० ते ६० रुग्णांपैकी न्यूमोनियाचे पाच ते सात रुग्ण आढळून येत असून, यामध्ये ४५ वर्षावरील इसमांचा जास्त भरणा असल्याचे डॉ. सचिन पवार यांनी सांगितले.
मागील १५ ते २० दिवसांपासून जिल्ह्यात न्युमोनिया, सारीचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येते. सरकारी रुग्णालयांत या रुग्णांवर उपचार केले जातात. न्यूमोनिया, सारीच्या रुग्णांची कोरोनाची चाचणीही केली जात आहे. मागील १५ दिवसांत न्यूमोनिया असलेल्या जवळपास १५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. खासगी दवाखान्यात न्यूमोनियाचे रुग्ण असतील आणि त्यांनी कोरोना चाचणीसाठी संदर्भित केले तर निश्चितच या रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येतील.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम