जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ११ लाखांपेक्षा अधिक आहे. या तुलनेने केवळ २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १५३ उपकेंद्रे कार्यरत आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आजमितीस रुग्णवाहिका देण्यात आलेल्या आहेत. यासह नव्याने मिळालेल्या सात रुग्णवाहिकाही रुग्णसेवेत कार्यान्वित झाल्या आहेत. असे असले तरी वनोजा, मोहरी, मेडशी, शेलुबाजार यासह इतरही काही प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे असलेल्या रुग्णवाहिका २००४ व २००७ च्या आहेत. त्या आज रोजी ‘आऊटडेटेड’ झाल्या असून, टायर पंक्चर होणे, टायर फुटणे, वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रकार बळावले आहेत. यामुळे ग्रामीण रुग्णांची गैरसोय होत असून, त्यांच्यातून नाराजीचा सूर उमटत आहे.
यासंदर्भात काही शासकीय रुग्णवाहिकांच्या चालकांशी संपर्क साधला असता, जुन्या झालेल्या रुग्णवाहिका वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढीस लागल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णवाहिका दुरुस्तीकरिता अमरावतीला जावे लागते. त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी तीन ते चार दिवस लागत असल्याने तोपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध नसते, असेही संबंधित रुग्णवाहिकांचे चालक म्हणाले.
...........................
बॉक्स :
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुविधांचा अभाव
जिल्ह्यात जेमतेम २५ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित आहेत. त्यातील केनवड, किन्हीराजा, शेलूबाजार, आसेगाव, शेंदूरजना या काही केंद्रांमध्ये आयुष्यमान भारत कार्यक्रमांतर्गत ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ सुरू करण्यात आले आहे; तर २२ केंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्राचा दर्जा देण्यात आला आहे. असे असले तरी आरोग्यविषयक सुविधांचा अभाव असून, रुग्णांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
..................
बॉक्स :
जिल्हा रुग्णालयात रोज ६५ रुग्ण रेफर
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रथमोपचार केल्यानंतर रुग्णांना पुढील उपचारांसाठी वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले जाते. हे प्रमाण दररोज सरासरी ६५ ते ७० पर्यंत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...................
रुग्णवाहिकांना नादुरुस्तीचे ग्रहण
ग्रामीण भागातून जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रामुख्याने प्रसूतीत अडचणी निर्माण झालेल्या गर्भवती मातांना ‘रेफर’ करण्यात येते. अधिकांश रुग्णवाहिकांना नादुरुस्तीचे ग्रहण लागले असून, प्रवासादरम्यान रुग्णवाहिका बंद पडल्यास गर्भवती मातांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते.
.................
रुग्णवाहिकेचाच विमा नाही
सर्व प्रकारच्या वाहनांचा विमा उतरविणे शासनस्तरावरून बंधनकारक करण्यात आले आहेत. असे असताना रुग्णवाहिकांचा विमा उतरविण्याकडे शासनाने अद्याप लक्ष दिलेले नाही. अपघातच होत नाही; तर विमा कशाला काढायचा, असे शासनाचे म्हणणे असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.