- दिनेश पठाडे वाशिम - जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण कुटुंबांना नळजोडणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत १ लाख ७८ हजार २८० कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली असून १०१ गावात हर घर जल पोहचले आहे. जानेवारी २०२४ पर्यंत जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी आढावा बैठकीत मंगळवारी दिल्या.
जिल्ह्यात २ लाख १९ हजार ५५४ ग्रामीण कुटुंब आहे. त्यातील १ लाख ७८ हजार २८० कुटुंबाना जल जीवन मिशनच्या माध्यमातून नळजोडणी देण्यात आली आहे. ४१ हजार २७४ कुटुंबांना नळजोडणी देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत ५६० गावात ५२१ योजना तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २२ गावात ५० योजना आहे. ५२ गावातील ५१ योजना ह्या निविदा प्रक्रियेमध्ये असून १०१ गांवे हर घर जल घोषित झाले असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे यांनी बैठकीत दिली.
बुवनेश्वरी म्हणाल्या की, ज्या ठिकाणी जल जीवन मिशनची कामे अद्याप सुरु झालेली नाही, ती कामे तातडीने सुरु करावी. मालेगांव हा आकांक्षित तालुका असल्याने या तालुक्यातील जल जीवनची कामे प्राधान्याने पुर्ण करण्यात यावी, गावातील कोणतेही कुटुंब नळजोडणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, आगामी निवडणूकीची आचारसंहिता लक्षात घेता सर्व कामे तातडीने पूर्ण करावी, जिल्हयात पाण्याचा सिंचनासाठी अवैधपणे वापर होत असेल तर वीज वितरण कंपनीने संबंधितांवर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.