वाईगौळ या गावातील रस्ता यापूर्वी राज्य महामार्ग म्हणून १९६७ मध्ये विकसित करण्यात आला असून, त्यावेळीही या गावातील नागरिकांच्या जमिनीचा मोबदला ग्रामस्थांना देण्यात आलेला नाही व आता या राज्य महामार्गाची दर्जोन्नती २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए अशी करून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधण्यात आलेल्या पक्क्या घरांना या राष्ट्रीय महामार्गामुळे बाधा पोहोचणार आहे.
------------------------------------------------------------------
वाईगौळ या गावातील ग्रामस्थांनी येथीलच तरुण विधिज्ञ श्रीकृष्ण राठोड यांच्या मार्गदर्शनात नुकसानभरपाईसंबंधी तहसील कार्यालय ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केलेला असून, प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दाद मिळत नसल्याने शिवसेना तालुका प्रमुख रवी पवार यांच्यामार्फत खासदार भावना गवळी यांच्याद्वारे शासनाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याचे लेखी पुरावे ॲड. श्रीकृष्ण राठोड यांच्याकडून देण्यात आल्यानंतर खा. भावना गवळी यांनी या गावातील ग्रामस्थांच्या न्याय्य मागणीला आता वाचा फोडली आहे. ग्रामस्थांच्या तब्बल पन्नास ते साठ वर्षांपासून घरे बांधलेल्या जागेची व घरांची व्यवस्थित मोजणी भूमिअभिलेख विभागामार्फत करण्यात येऊन बाधित ग्रामस्थांना नुकसानभरपाई देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
रा. मा. विभागाकडे वाईगौळ येथील रस्त्याची रुंदी २५ मीटर आहे, याबाबत कुठलेही वैध दस्तावेज उपलब्ध नसल्याने या गावातील नागरिकांना तात्काळ मोबदला देऊन त्यांच्या मनावरील भीतीचा डोंगर दूर करण्यात यावा.
-ॲड. श्रीकृष्ण राठोड, वाईगौळ
पोहरादेवी आणि वाईगौळ ही भविष्यात तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे असल्याने या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना संघर्ष करायला भाग न पाडता त्यांच्या न्याय्य बाजू विचारात घेऊन शांततेने व तातडीने विकास कामे पार पाडली जावीत.
- रवी पवार, शिवसेना तालुकाप्रमुख मानोरा