कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे. दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे. जिल्ह्यात १५ फेब्रुवारी २०२१ अखेर असलेला कोरोना रुग्णांचा ८,९३४ चा आकडा २० मे २०२१ अखेर ३७,२७७ वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत ३८४ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला असल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाला हलक्यात न घेता गांभीर्य ओळखून नागरिकांनी किमान कडक निर्बंधाच्या काळात विनाकारण घराबाहेर पडू नये. नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. असे असतानाही अनेकजण कुठलेही विशेष प्रयोजन नसताना घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांची विशेषत: चेकपोस्टवर कोरोना चाचणी केली जात आहे; तर शहरी भागात दंडात्मक कारवाईचा धडाका पोलीस प्रशासनाने लावला आहे. याउपरही अनेकांकडून नियमांचे उल्लंघन करणे सुरूच आहे.
...................
३७२७७
कोरोनाचे एकूण रुग्ण
३२७९१
एकूण कोरोनामुक्त
.........
६२००
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विनाकारण फिरणाऱ्यांची केली चाचणी
१०७०
पाॅझिटिव्ह किती?
..........
कारणे तीच, कुणाचा दवाखाना तर कुणाचा भाजीपाला
वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा अशी सहा शहरे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन वेळोवेळी केले जात आहे; मात्र रिकामटेकड्यांकडून त्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
पोलिसांकडून विचारणा झाल्यास दवाखान्यासाठी किंवा भाजीपाला आणण्याकरिता घराबाहेर पडल्याची तीच ती कारणे सांगितली जात आहेत.
..................
२३ चेक पोस्टवर कोरोना चाचणी
जिल्ह्यात २३ ठिकाणी चेक पोस्ट तयार करून सिमा सील करण्यात आल्या आहेत. या सर्वठिकाणी परजिल्ह्यातून येणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. याशिवाय शहरी भागातील प्रमुख चाैकांमध्ये व विशेषत: बॅंकांमध्ये फिरत्या पथकांकडून कोरोना चाचण्या करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या रिकामटेकड्यांचा यात अधिक समावेश असल्याचे दिसून येत आहे.