वाशिम : हिंदू संस्कृतीमधील सर्वात मोठा दिवाळी हा सण आगामी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात, १२ नोव्हेंबरला साजरा होणार आहे. यानिमित्त कुटूंबातील सर्वांना कपडेलत्ते घ्यावे लागणार आहेत. किराणा साहित्यासह अन्य बाबींवरही मोठा खर्च होणार आहे. ही बाब लक्षात घेता शिक्षण क्षेत्रातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे, असा मुख्याध्यापक संघाचा आग्रह असून शिक्षणाधिकाऱ्यांना तशी गळ घालण्यात आली आहे.
महागाईचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. त्यातुलनेत हाती पडणारा पगार पुरेनासा झाला आहे. दिवाळीच्या सणादरम्यान तर खर्चाचे प्रमाण अधिक वाढते. यामुळे महिन्याच्या पगारातून भागविता येणे अशक्यच आहे. ही बाब लक्षात घेवून मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार ‘ॲडव्हान्स’मध्ये अर्थात दिवाळीपूर्वीच अदा करण्यात यावा, अशी मागणी मुख्याध्यापक संघाकडून शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
चार टक्के पगारवाढ लागू करण्यास विलंबकेंद्र शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२३ पासूनच चार टक्के पगारवाढ लागू केली. नियमानुसार महाराष्ट्र शासनालाही त्याची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. मात्र, ऑक्टोबर महिना संपत येत असतानाही पगारवाढीची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळेच नोव्हेंबरचा पगार दिवाळीपूर्वी करण्याची मागणी मुख्याध्यापक संघाकडून करण्यात आली आहे.
दिवाळीच्या सणादरम्यान नेहमीच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण अधिक राहते. त्यामुळेच ऑक्टोबरचा पगार तर होणारच; पण त्यासोबतच नोव्हेंबरचाही पगार दिवाळीपूर्वी अदा करण्याची मागणी आम्ही केली आहे. शिक्षण विभाग दखल घेवून मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिलासा देईल, अशी अपेक्षा आहे.- विनोद नरवाडे, जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ, वाशिम