लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ : दोन वेळा वीज मीटर बदलून दिल्यानंतरही देपूळ येथील ग्राहकाला ‘फॉल्टी’च्या नावाखाली विद्युत देयक आकारले जात आहे. याप्रकरणाची चौकशी करून दोषीविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी वीजग्राहक गजानन सीताराम वाघमरे यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे बुधवारी केली.वाशिम तालुक्यातील देपूळ येथील गजानन वाघमारे यांनी घरगुती वीजजोडणी घेतली. परंतु काही वर्षांनंतर वीज मीटर बंद पडल्याने महावितरणकडे रितसर अर्ज करून ‘३१७५४०३८००५१’ या क्रमांकाचे मीटर बदलून ‘१२४४२८४०’ क्रमांकाचे वीज मीटर देण्यात आले. परंतु हे मीटर मंगरूळपीर तालुक्यातील मानोली येथील नागरिकाच्या नावाने ‘लाइव्ह’ केले. हा प्रकार संबंधित अभियंत्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर उपरोक्त मीटर बदलून ‘८७४१७३८’ या क्रमांकाचे नवीन मीटर देण्यात आले. त्यामुळे या मीटरच्या रीडिंगप्रमाणे वीज देयक आकारणी होणे अपेक्षित आहे. परंतु जुन्या फॉल्टी मीटरनुसार वीज देयक आकारले जात आहे. विद्युत देयकात दुरुस्ती करून नवीन मीटरनुसार देयक देण्याची मागणी गेल्या सहा महिन्यांपासून महावितरणकडे करण्यात आली. परंतु, अद्याप यामध्ये दुरुस्ती झाली नाही. याकडे लक्ष देऊन दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी तसेच विद्युत देयकात दुरुस्ती करण्याची मागणी वाघमारे यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे बुधवारी केली. दरम्यान, कोरोनाकाळात एप्रिल ते सप्टेंबर या दरम्यान मीटर रिडींग न घेता अनेकांना सरासरी विद्युत देयक आकारण्यात आले. यामुळे अनेकांना अव्वाच्या सव्वा देयके आली असून, यामध्येदेखील दुरूस्ती होणे गरजेचे आहे.
नवीन वीज मीटर देऊन जुन्या वीज मीटरप्रमाणे देयके आकारणे, बदलून दिलेले मीटर दुसऱ्याच्या नावाने फीड करणे हा प्रकार गंभीर असून, त्याची सखोल चौकशी केली जाईल.- आर. जी. तायडे, कार्यकारी अभियंता महावितरण, वाशिम