दगड उमरा : वाशिम तालुक्यातील दगड उमरा येथे एकच लहानसा पाझर तलाव आहे. त्या पाझर तलावातील पाण्याचा साठा कमी असल्यामुळे तलावाने तळ गाठला आहे. यामुळे येथे गुरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
वाशिम तालुक्यातील दगड उमरा हे जवळपास ६०० ते ७०० लोकवस्तीचे गाव आहे. या गावालगतच तीन ते चार एकरातील पाझर तलाव असून या तलावाच्या पाण्यामुळे गावातील पाण्याची पातळी राहते, तर या तलावातील गुरांना मोठा आधार असतो. परंतु तलावाची खोली व रुंदी कमी असल्यामुळे पाझर तलावात कमी साठा राहिल्याने दगड उमरा येथील पाझर तलावाने हिवाळ्यातच तळ गाठला आहे. पाझर तलावात कमी पाण्याचा साठा असल्यामुळे काही वर्षांत खालावलेल्या भूजलपातळीचा परिणाम या तलावाच्या जलसाठ्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. ऐन हिवाळ्याच्या शेवटाला या पाझर तलावाने तळ गाठला आहे. या तलावात तहान भागविण्यासाठी गुरांची धडपड असल्याचे चित्र आताच पाहायला मिळत असून येत्या उन्हाळ्यापूर्वीच येथे गुरांच्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासनाने या तलावाचे खोलीकरण करावे, अशी मागणी दगड उमरा येथील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे