बुलडाणा : तालुक्यातील सैलानी वनक्षेत्रपरिसरात येणा-या अंधारी बीट मध्ये अवैधरित्या मोराची शिकार झाल्याची घटना आज ६ जुलै रोजी उघडकीस आली. मोराची शिकार केल्यानंतर आरोपी फरार झाले. मात्र बुलडाणा वनविभागाच्या कर्मचा-यांनी कारवाई करुन मृतावस्थेत मोर, मोटरसायकल तसेच शिकारीचे जाळे जप्त केले आहे. प्राप्त माहितीनुसार, बुलढाणा वनविभागाला सैलानी वनपरिक्षेत्रातील अंधारी बीटमध्ये वन्यप्राणी व पक्षांची शिकार होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. यानुसार आज ६ जुलै रोजी अंधारी बीटमध्ये वनरक्षक एस.डी. परिहान, प्रभारी डी.एफ़ओ.अजय जावरे, आर.एफ.ओ.सोळंकी यांनी पाहणी केली असता झुडपात तीन शिकारी आिण मोटरसायकल आढळून आले. मात्र कर्मचारी तेथे पोहचण्याआधीच सदर शिकार्यांनी तेथून पळ काढला. मात्र कर्मचार्यांनी घटनास्थाळाहून मृतावस्थेत मोर, मोटरसायकल आणि शिकारी जाळे जप्त केला. तसेच फरार आरोपी विरुद्ध भारतीय वन्यजिव सरंक्ष अधिनियम १९७२च्या कलम ९,२९,३१,५(१) तसेच वनअधिनिय १९२७च्या कलम २६(आय)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत वनपाल पी.टी.कसले, पी.एम.बुटे, वनरक्षक शरद घुगे, ए.ए.गीते, नलींदे आदी सहभागी झाले.
सैलानी वनपरिक्षेत्रात मोराची शिकार
By admin | Published: July 06, 2014 10:43 PM