लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सहाही शहरांमध्ये सुरू असलेल्या सर्व शिकवणीवर्गांचे ‘फायर आॅडिट’ करून अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी २६ जून २०१९ ला सर्व नगर पालिकांना दिले होते; मात्र पाच महिन्याचा मोठा कालावधी उलटूनही त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नसून हा प्रश्न अद्यापपर्यंत प्रलंबित आहे.जिल्ह्यातील सहाही शहरांमध्ये आठवी ते बारावीच्या शिकवणी वर्गासह नीट, जेईई यासारख्या अभ्यासक्रमांचे शिकवणी वर्गही चालविले जातात. विद्यार्थ्यांच्या गर्दीने सदोदित भरून राहणाºया या शिकवणीवर्गांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्याची चांगली व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी, सुसज्ज स्वच्छतागृह असण्यासोबतच कधीकाळी आगीची घटना घडल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी शिकवणीवर्गाच्या परिसरात अग्निअवरोधक यंत्र लावलेले असणे बंधनकारक आहे. याशिवाय इमारत परिसरात मोकळी जागा, संकटकालिन परिस्थितीत विद्यार्थ्यांना तत्काळ बाहेर पडता येण्यासाठी स्वतंत्र पायºया, मोकळा पार्किंग परिसर असणे अत्यावश्यक आहे. या सर्व सुविधा जिल्ह्यातील शिकवणी वर्गांमध्ये अस्तित्वात आहेत किंवा नाही, याची चाचपणी आणि फायर आॅडिट करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी २६ जून २०१९ रोजी दिले होते. त्याची अंमलबजावणी सुरू असल्याचे दाखवत जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मंगरूळपीर, कारंजा नगर परिषद आणि मालेगाव, मानोरा नगर पंचायतीने त्यांच्या कार्यक्षेत्रातील शिकवणीवर्गांना नोटीस बजावून ‘फायर आॅडिट’ करून घ्यावे व त्याचा अहवाल एका महिण्यात सादर करावा, अशा सूचना देखील दिल्या होत्या; मात्र हा विषय तेवढ्यापुरताच मर्यादित राहिला असून प्रशासनाकडून ठोस पाठपुरावा न झाल्याने शिकवणीवर्गांनीही ‘फायर आॅडिट’च्या गंभीर मुद्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिकवणीवर्ग संचालकांकडून ‘फायर आॅडिट’ करून घेण्याच्या सक्त सूचना जिल्ह्यातील सर्व नगर पालिकांना देण्यात आल्या होत्या. मध्यंतरी विधानसभा निवडणुकीमुळे या विषयाकडे निश्चितपणे दुर्लक्ष झाले; परंतु आता नगर पालिकांकडून याबाबत जाब विचारण्यात येईल.- ऋषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम