लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने, कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून मानोरा येथे २७ जुलैपासून तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवली जाणार आहे. पहिल्याच दिवशी संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.बाहेरगावावरून परतणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मे महिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रित होती. जून महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्यात यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून यापूर्वी रिसोड व मंगरूळपीर शहरात सात दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. मानोरा शहरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी मानोरा व्यापारी संघटना, तहसील कार्यालय व नगर पंचायत प्रशासनाने २७ जुलै ते २९ जुलैदरम्यान तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय २६ जुलै रोजी घेतला. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सोमवार, २७ जुलैपासून झाल्याचे दिसून आले. मानोरा शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण, नगरपंचायतचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी एक बैठक घेऊन यापुढे सर्वांनी अधिक सतर्क राहण्याबाबत चर्चा झाली. सोमवार ते बुधवार अशी तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याच्या निर्णयासह जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहनही करण्यात आले. त्यानुसार सोमवार २७ जुलै रोजी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आल्याने शुकशुकाट दिसून आला. बुधवारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवली जाणार असून, नागरिकांनीदेखील जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे आवाहन प्रशासन व व्यापाºयांनी केले.
‘जनता कर्फ्यू’: मानोरा शहर कडकडीत बंद; बाजारपेठेत सामसूम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:32 PM