वाशिम : जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अपवाद वगळता अन्य बँकांकडून अपेक्षित सहकार्य मिळणे दुरापास्त झाल्याने मुदत संपत आली असताना खरीप पीक कर्जवाटपाचे प्रमाण मात्र २५ जूनपर्यंत अवघ्या ९ टक्क्यांवरच असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने केलेले प्रयत्न यामुळे निष्फळ ठरत असून पीक कर्जाची मागणी करणारे शेतकरीही पुरते हतबल झाले आहेत.शासनाकडून पाठविली जाणारी कर्जमाफीची शेवटची यादी अद्याप अप्राप्त आहे. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतल्याने ते खरीप पीक कर्जासाठी अद्याप पात्र ठरले नाहीत. याशिवाय कर्ज पुनर्गठीत झालेल्या काही शेतकऱ्यांनी दीड लाख रुपये वगळता उर्वरित रक्कम भरली नसल्याने ते देखील कर्ज मिळण्यापासून वंचित आहेत. ज्यांना पीक कर्ज हवे आहे, त्यांना बँकेकडून पुरेसे सहकार्य मिळणे अशक्य झाले. एकूणच या सर्व प्रतिकुल बाबींमुळे खरीप पीक कर्ज वाटपाची मुदत संपण्याच्या मार्गावर आली असताना २५ जूनपर्यंत कर्ज वाटपाचे प्रमाण १,४७५ कोटींच्या तुलनेत १४४ कोटींच्या आसपास असल्याचे दिसून येत आहे. तथापि, जिल्हयातील पात्र असलेल्या सर्व शेतकºयांना वेळेत पीककर्ज मिळण्यासाठी सर्व बॅकांनी शाखानिहाय चोख नियोजन करावे, बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पुर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यातील सर्व बॅकांना दिले आहेत. यासंदर्भात चालू हंगामात चार ते पाच वेळा संबंधित सर्व बँक प्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा बैठका देखील घेण्यात आल्या. मात्र, याऊपरही कर्ज वाटपाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत नाही.
प्रशासनाच्या ‘व्हाट्सअप’ क्रमांकावर दैनंदिन तक्रारी!
जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या पीक कर्ज नोंदणी संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज नोंदणी करणाºया शेतकºयांच्या अर्जावर बँकेने कोणती कार्यवाही केली, याची माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना दिले आहेत. याशिवाय पीक कर्जाविषयी कुठलीही तक्रार असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केलेल्या ‘ई-लोकशाही’ कक्षात ती नोंदवावी. तसेच यासंदर्भातील तक्रार नोंदविण्याकरिता प्रशासनाने ८३७९९२९४१५ हा व्हाट्सअप क्रमांक जाहीर केला असून त्यावर दैनंदिन ८ ते १० शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बँकेकडून नो-ड्यूज मागविले जाते, बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करते, पिकविम्याची रक्कम कर्ज खात्यात वळती केली जात आहे, अशासंदर्भातील तक्रारींचा त्यात समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.