कमी पावसाचा परिणाम: दगड उमऱ्यात गुरांच्या पाण्याची समस्यालोकमत न्यूज नेटवर्कदगड उमरा (वाशिम) : वाशिम तालुक्यात इतर गावांच्या तुलनेत दगड उमरा परिसरात कमी पाऊस पडला. त्यामुळे हिवाळ्याच्या सुरुवातीलाच दगड उमरा येथील पाझर तलावाने तळ गाठला आहे. तलाव आटत चालल्याने येथे गुरांच्या पाण्याची समस्या भेडसावणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.वाशिम तालुक्यातील दगड उमरा हे जवळपास ४०० लोकवस्तीचे गाव आहे. या गावालगतच चार ते पाच एकर क्षेत्रात पाझर तलाव असून, या तलावाच्या पाण्यामुळे गावातील पाणीपातळी टिकून राहते, तर या तलावाचा गावातील गुरांना मोठा आधार असतो.; परंतु गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अपुरा पाऊस झाल्याने दगड उमरा येथील पाझर तलाव पावसाळ्याच्या अखेरीपासूनच कोरडा पडला, तर यंदा गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला तरी, दगड उमरा परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्याने हा पाझर तलाव भरलाच नाही. गेल्या काही वर्षांत खालावलेल्या भुजलपातळीचा परिणाम या तलावाच्या जलसाठ्यावर होत असून, ऐन हिवाळ्याच्या सुरुवातीलाच या पाझर तलावाने तळ गाठला आहे. या तलावात गुरे तहान भागविण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आताच पाहायला मिळत असून, येत्या उन्हाळ्यापूर्वीच येथे गुरांच्या पाण्याची समस्या उग्र रुप धारण करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
दगड उमरा येथील पाझर तलावाने हिवाळ्यातच गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 3:54 PM