वाशिम : बनावट विदेशी दारू तसेच भेसळयुक्त मद्यविक्री करणाऱ्या वाशिम हद्दितील पंचाळा येथील आयुष वाईन बारचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. वाशिम हिंगोली रस्त्यावरील मौजे पंचाळा ता. वाशिम हद्दीतील प्रभाकर वानखेडे यांच्या नावे असलेले आयुष्य वाईन बारमध्ये हलक्या दर्जाची विदेशी दारू मिसळून वेगवेगळ्या कंपन्यांची विदेशी बनावट दारू तयार केली जात होती.
बारमध्ये वाहतूक पासवर आलेल्या विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्यांच्या माध्यमाने बनावटी विदेशी दारूची बेकायदेशीर विक्री सुरू होती. या संदर्भातील माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभाग वाशिम व स्थानिक गुन्हे शाखा वाशिमचे पथक यांनी संयुक्तरीत्या आयुष्य वाईन बारवर २ सप्टेंबर रोजी धाड टाकली. यावेळी तेथे वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळ्या ब्रँडची विदेशी दारू, देशी दारू, प्लास्टिकचे बूच आदी ४,४३,५७९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा तसेच प्रभाकर वानखेडे व त्यांचा मुलगा आयुष प्रभाकर वानखेडे यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम ५४ (१) (ब) (क) मधील तरतुदीनुसार प्रभाकर महादू वानखेडे यांचे नावे मौजे पंचाळा ता.वाशिम येथील आयुष वाईन बार अनुज्ञप्ती क्र. १०८/२०२२-२३ कायमस्वरूपी रद्द करण्यात आला. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क, अधीक्षक अभिनव बालुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गोपीनाथ पाटील, दुय्यम निरीक्षक किरण वराडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रंजीत आडे, जवान नितीन चिपडे, निवृत्ती तिडके, ललित खाडे, स्वप्निल लांडे तसेच पोलीस विभागातील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी यांनी केली आहे.