वाशिम: वारंवार तपासणी केल्यानंतरही फ्लोराइडचे प्रमाण जास्त आढळून आल्याने जिल्हय़ातील एकूण २३ जलस्रोत कायमस्वरूपी बंद केले. यामध्ये मानोरा तालुक्यातील सर्वाधिक आठ जलस्रोतांचा समावेश आहे. जिल्हय़ात ४९३ ग्रामपंचायतींमध्ये पाणीपुरवठा योजना, विहीर, बोअरवेल आदींच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पावसाळा आणि उन्हाळ्याच्या दिवसात दूषित पाणीपुरवठय़ामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता सर्वाधिक असते. या पृष्ठभूमीवर जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाणी नमुने तपासणी केली जाते. तालुकानिहाय प्राप्त पाणी नमुने तपासणीतून काही धक्कादायक बाबी समोर येतात. जिल्हय़ातील एकूण २३ जलस्रोतांमध्ये फ्लोराइडचे प्रमाण जास्त आढळून आल्याने या जलस्रोताच्या पाण्याची तीनपेक्षा अधिक वेळ तपासणी केली. पाण्यात साधारणत: १.५ पीपीएमपेक्षा जास्त फ्लोराइडचे प्रमाण आढळून आले तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून सदर पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. या पाण्यामुळे हाडे ठिसूळ होणे आणि दंतरोग होण्याची शक्यता सर्वाधिक असते. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी सदर २३ जलस्रोत कायमस्वरूपी बंद करण्याची शिफारस आरोग्य प्रयोगशाळेने केली. शिफारसीनंतर संबंधित २३ जलस्रोत कायमस्वरूपी बंद करण्यात आले. या जलस्रोतावर पिण्यास अयोग्य असे बोधचिन्ह व इशारा लिहिण्यात आला. मानोरा तालुक्यातील आठ, कारंजा तालुक्यातील पाच, रिसोड व वाशिम तालुक्यातील प्रत्येकी चार आणि मंगरुळपीर तालुक्यातील दोन अशा २३ जलस्रोतांचा कायमस्वरूपी बंदमध्ये समावेश आहे.
दूषित पाण्याचे २३ जलस्रोत कायमस्वरूपी बंद
By admin | Published: November 21, 2015 2:02 AM