दादाराव गायकवाड / कारंजा (जि. वाशिम): पंचायत समितीकडून तीन वर्षांंपूर्वी मंजूर झालेल्या सिंचन विहिरीच्या खोदकामासाठी अद्यापही परवानगी न मिळाल्याने कारंजा तालुक्यातील कुपटी येथील एका हताश शेतकर्याने अखेर इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. पंचायत समितीच्या कारभाराला वैतागलेल्या कुपटी येथील शेतकरी विजय देशमुख या शेतकर्याने सिंचन विहिरीच्या कामाला त्वरीत परवानगी द्या किंवा इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी सोमवारी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. अल्पभूधारक शेतकरी विजय देशमुख यांना २0१२ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर मंजूर झाली होती; परंतु सदर विहिरीचे खोदकाम काही दिवस सुरू न करण्याची सूचना ग्रामपंचायत सचिवांकडून देण्यात आली. या संदर्भात विजय देशमुख यांनी कारंजा पंचायत समितीमधील संबंधित अधिकार्यांशी वारंवार संपर्क केला; परंतु त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यांना २0१२ मध्येच विहीर खोदण्याची परवानगी देण्यात आली असती तर त्यांना तीन वर्षांंत सिंचनकरून शेतीमधून उत्पन्न मिळविता आले असते. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थितीही सुधारू शकली असती; परंतु त्यांना परवानगी देण्यात आली नाही. मागील दोन वर्षांंपासून दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांच्या कोरडवाहू शेतीत अल्प उत्पादन झाल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाली. त्यांना बँका आणि खासगी सावकारांचे शेतीसाठी घेतलेले कर्जही फेडता आले नाही. त्यामुळे ते चिंताग्रस्त झाले असून, त्यांनी या वर्षात सिचन विहीर खोदण्याची परवानगी द्यावी किंवा इच्छामरणाची परवानगी द्यावी, असे वाशिम जिल्हाधिकार्यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
शेतक-याने मागितली इच्छामरणाची परवानगी
By admin | Published: November 25, 2015 2:21 AM