वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात ८ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्ण्मुगराजन एस. यांनी २६ फेब्रुवारी रोजी निर्गमित केले आहेत. या आदेशात बदल करून जिल्ह्यातील अभ्यासिका एकूण आसन क्षमतेच्या २५ टक्के आसन क्षमतेने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्ण्मुगराजन एस. यांनी ३ मार्च रोजी निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार अभ्यासिकेच्या एकूण आसन क्षमतेच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश राहील. अभ्यासिकेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय अभ्यासिकेत प्रवेश देऊ नये. अभ्यासिकेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची १५ - १५ दिवसांनी कोविड चाचणी करणे अनिवार्य राहणार आहे. अभ्यासिकेमध्ये मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल; व अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.