खामगाव : बियाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी वाशिम येथील ५० शेतकऱ्यांनी राज्याचे कृषी तथा फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या बंगल्यावर शनिवारी आत्मदहनाचा इशारा दिला. या आंदोलनातील १८ शेतकऱ्यांना शहरातील विविध ठिकाणी पकडण्यात आले. दुपारी अडीच वाजता मोरक्यासह तिघांना ताब्यात घेण्यात आले. शेतकऱ्यांच्या सामूहिक आंदोलनामुळे पोलीस प्रशासन चांगलेच जेरीस आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्मदहनाच्या पार्श्वभूमीवर फुंडकर यांच्या बंगला परिसरासह शहरातील मोठ्याच्या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली. जलंब नाक्यासोबतच ना. फुंडकरांच्या घराकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बॅरीकेटस् लावण्यात आले. पहाटे पासनूच पोलीस शहरातील प्रत्येक संशयास्पद हालचालीवर नजर ठेवून होते. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ७ जणांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दुपारी १२ वाजता कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर आपल्या बंगल्यातून बाहेर पडले. दुपारी अडीचवाजेपर्यंत आंदोलक पोलिसांचा लंपडाव सुरू होता. उपविभागीय पोलिस अधिकारी बंगल्यासमोर ठाण मांडून असतानाच, तीन-चार आंदोलकांनी एका हॉस्पिटलमधून फुंडकरांचा बंगला गाठला. पोलिसांनी धावाधाव करून शेकऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाली. त्याचवेळी पोलिसांनी आंदोलकांच्या खिशातून विषाच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. त्यानंतर आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व करणारे पंजाबराव अवचार, विलासराव गायकवाड, मदनराव ढोले, गजानन अवचार, गजानन भारती, रामदास फुके, जानराव टेकडे यांच्यासह एकुण १८ आंदोलकांना ताब्यात घेतले.
सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलन!वाशिम जिल्ह्यात सन २०१० पासून सुमारे १८ शेतकरी उत्पादक कंपन्या, गट, मंडळाने हजारो क्विंटल बियाणे उत्पादन करीत आहेत. आतापर्यंत बियाणे उत्पादन व वितरण अनुदान मिळालेले आहे. पूवार्नुभव लक्षात घेता सन २०१६-१७ मध्ये ९९६.७० क्विंटल हरभरा बियाणे उत्पादन केले. त्यापोटी बियाणे उत्पादन व वितरण अनुदान मिळणे अपेक्षीत आहे. सदर अनुदान मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींसह कृषी विभागाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात आला. अनुदान मिळाले नसल्याने उत्पादक गट व कंपनीच्या शेतकºयांनी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांकडे निवेदन देत अनुदान देण्याची मागणी केली. यावर कोणताच सकारात्मक निर्णय न झाल्याने २२ मार्च रोजी मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना निवेदन व स्मरणपत्र देत ३० मार्चपर्यंत अनुदान न मिळाल्यास ३१ मार्च रोजी खामगाव येथे सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा बियाणे उत्पादक गट व कंपनीच्या शेतकºयांनी दिला होता.
आंदोलकांना पोलिसांना चकमा!वाशीम जिल्ह्यातील ५० बियाणे उत्पादक शेतकºयांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर १८-२० आंदोलक खामगावात दाखल झाले. बस स्थानकावरील कॅन्टीन, शहरातील अशोक गेस्ट हाऊस, नगर पालिका प्रशासकीय इमारत, अग्निशमन विभाग, ग्रामीण पोलिस स्टेशन, धोबी खदान, रेल्वे लाईन, मराठी शाळा क्रमांक १२ मार्गे एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचा आश्रय घेत ना. फुंडकरांच्या बंगल्याकडे येत असतानाच पोलिसांनी तीन आंदोलकांना ताब्यात घेतले.
नाकाबंदीतही पत्रकार परिषद!आंदोलकांच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर खामगाव पोलिसांनी शहरातील प्रत्येक मार्गावर नाकाबंदी केली. मात्र, ही सर्व नाकाबंदी भेदत, आंदोलकांनी शहरात प्रवेश करीत पोलिसांच्या नाकावर टिच्चून माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पत्रकार परिषदही घेतली. उल्लेखनिय म्हणजे, प्रशासनाकडून खुपियांचा देखील आसरा घेण्यात आला. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.
राजकीय उद्देशाने प्रेरीत आंदोलन होते. आंदोलकांना न्याय देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. ५० टक्के अनुदान देण्यात आले असून, उर्वरीत ५० टक्के अनुदान देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरी देखील फार्स म्हणून आंदोलनाचा प्रयत्न होत आहे. ही बाब दुर्देवी आहे.भाऊसाहेब फुंडकर. कृषी तथा फलोत्पादन मंत्री, महाराष्ट्र राज्य.