कामरगाव : सद्यपरिस्थितीत सोयाबीनवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने, धोक्यात आलेले सोयाबीन पीक वाचविण्यासाठी महागड्या कीटकनाशकाची फवारणी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे. ही फवारणी करताना महिन्याभरात १४ जणांना विषबाधा झाल्याची घटना कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात घडली. त्यामुळे विषबाधेच्या या घटना टाळण्यासाठी फवारणी करतांना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेतात कीटकनाशकाची फवारणी करतांना अंग झोंबणे, घाम येणे, मळमळ होणे, अशी लक्षणे दिसल्याने विषबाधा झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी कामरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींना कामरगाव ग्रामीण रुग्णालयातील उपचारानंतर सुट्टी देण्यात आली, तर दोघांवर अद्यापही उपचार सुरू आहे. विषबाधा झालेल्यांत धनराज बांगडे माळेगाव, ओम मुंदे ब्राह्मणवाडा, आश्विन ठाकरे बाबापूर, चिराग शहा मस्तान शहा ब्राह्मणवाडा, देविदास पाटील विळेगाव, सूरज कैकाडी कामरगाव, श्रीकृष्ण बेंदरे बेंबळा, चंदू शेलोकार कामरगाव, किशोर कांबळे कामरगाव, मनिष देशमुख कामरगाव, लखन तायडे बांबर्डा, नरेश डाखोरे बांबर्डा, आशिष पवार शिंगणापूर व दिनेश भोसले शिंगणापूर यांचा समावेश आहे. कीटकनाशकाची फवारणी करताना एवढ्या मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याने, विषबाधेचा हा प्रकार कृषी विभागाने गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली असून, कृषी विभागामार्फत फवारणी किट उपलब्ध करून देण्याची मागणी केल्या जात आहे.