यासंदर्भात माहिती देताना केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील शिरसाट यांनी सांगितले की, देशभरात व राज्यातही १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. औषधी विक्रेते व त्यांच्या दुकानांमधील कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून २४ तास सेवा देत आहेत. त्यांच्या योगदानामुळेच संपूर्ण देशासह महाराष्ट्रात औषधी पुरवठा सुरळीत राहणे शक्य झाले आहे. कोरोना रुग्ण तसेच नातेवाइकांसोबत औषधी विक्रेत्यांचा जवळून संपर्क येतो. असे असतानाही औषधी विक्रेते सेवा देत आहेत.
कोरोनाकाळातील ही सेवा लक्षात घेता औषध विक्रेते व त्यांच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देणे अपेक्षित आहे; मात्र अद्याप शासनाने लक्ष दिले नाही. सरकारच्या या भूमिकेबद्दल संताप व्यक्त करीत सर्व औषध विक्रेत्यांनी ३१ मे रोजी आपापल्या दुकानांमध्ये टाळ्या वाजवून निषेध नोंदविला.
....................
कोट :
कोरोनाकाळात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी औषधी विक्रेते व कर्मचाऱ्यांचा जवळचा संपर्क आला. यामुळे औषध विक्रेत्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य व कर्मचारीदेखील कोरोनाबाधित झाले. असे असताना शासनाने लसीकरणात प्राधान्य दिले नाही. त्यामुळे ३१ मे रोजी शांततेच्या मार्गाने टाळ्या वाजवून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
- राजेश पाटील शिरसाट,
जिल्हाध्यक्ष, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, वाशिम