वाशिम : क्षयरोगमुक्त भारताची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याकरिता शासनाचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यानुषंगाने क्षयरुग्णांना कोरडा आहार पुरविण्यासाठी दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थांना ‘निक्षय मित्र’ बनून कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. या महत्वाकांक्षी मोहीमेत आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबईचे उपसंचालक डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी देखील सहभाग घेतला असून स्वत: निक्षय मित्र बनून मानोरा तालुक्यातील ४ क्षयरुग्णांना त्यांनी २८ सप्टेंबर रोजी दत्तक घेतले.
९ सप्टेंबर २०२२ रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान’ या महत्वाकांक्षी योजनेची मुहूर्तमेढ रोवली. गोरगरिब कुटूंबातील ज्या व्यक्तींना क्षयरोगाने ग्रासले आहे, ते केवळ पैशांअभावी आवश्यक असलेला कोरडा आहार घेवू शकत नाहीत. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढे येवून गरजू क्षयरुग्णांना दत्तक घेत कोरडा आहार पुरवावा, याबाबत प्रभावी जनजागृती केली जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आजरोजी एकंदरित ९०८ क्षयरुण उपचाराखाली आहेत. त्यातील ३८० क्षयरुग्णांना निक्षय मित्रांनी दत्तक घेतले आहे; तर उर्वरित ५२८ क्षयरुग्णांना निक्षय मित्राची प्रतिक्षा लागून आहे. यादरम्यान २८ सप्टेंबर रोजी आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेण्यासाठी आलेले आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबईचे उपसंचालक डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिमेच्या प्रशिक्षण कार्यक्रमास भेट देऊन ४ क्षयरुग्णांना दत्तक घेतले. सोबतच पुढील वर्षभरासाठी निक्षय मित्र बनून संबंधितांना पोषण आहाराची कीट देखील वितरित केली. जिल्ह्यातील दानशूरांनी या मोहीमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होवून क्षयरुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
चोंढी (ता.मानोरा) हे माझे मूळ गाव आहे. त्याठिकाणी सध्या सक्रीय असलेले आणि यापुढे आढळणारे सर्व क्षयरुग्ण मी स्वत: दत्तक घेण्याचा संकल्प केला आहे. निक्षय मित्र बनून कार्य करित असताना संबंधितांना कोरडा आहार पुरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.- डाॅ. दुर्योधन चव्हाण, आरोग्य उपसंचालक, मुंबई
जिल्ह्यातील क्षयरुग्णांना कोरडा आहार पुरविण्यासाठी ‘निक्षय मित्र’ जोडण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहीमेत आरोग्य उपसंचालक डाॅ. दुर्योधन चव्हाण यांनी सहभाग नोंदवून जिल्ह्यातील ४ क्षयरुग्णांना दत्तक घेतले. त्यांचा हा पुढाकार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.- डाॅ. सुहास कोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम