रिअॅलिटी चेक
मंगरूळपीर : मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून वारंवार केले जात असले तरी आरोग्य यंत्रणेच्या कार्यालयातच या दोन्ही नियमांचा कसा फज्जा उडतो, हे सोमवार, १९ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथील गर्दीवरून दिसून येते. ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर सोमवारी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि हात वारंवार धुवावे या त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागातर्फे दिल्या जातात. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. मंगरूळपीर येथेही ग्रामीण रुग्णालयातील केंद्रात लसीकरण केले जात आहे. मागील आठवड्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने काही दिवस लसीकरण केंद्रात लस देणे बंद होते. एका दिवसापूर्वी कोरोना लसीचे डोस प्राप्त झाल्याने येथे लसीकरण सुरू झाले आहे. लस घेण्यासाठी सोमवारी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे येथे दिसून आले. गर्दी हटविण्यासाठी किंवा रांगेत फिजिकल डिस्टन्सिंगने उभे राहण्यासाठी कुणी कर्मचारी बाहेर आला नाही किंवा सूचना दिल्या नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीकरण केंद्रावर कोरोनाविषयक नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे.