वाशीम - येथील चित्रकार आणि कलाशिक्षक रा. मु. पगार यांनी गेल्या कित्येक वर्षात शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अडचणी आपल्या कुंचल्यातून चित्रकृतीत साकारल्या आहेत. २८ व २९ एप्रिल असे दोन दिवस राजस्थान आर्य महाविद्यालयाच्या शेजारी असणाऱ्या रावले यांच्या शेतात या चित्रप्रदर्शनीचे आयोजन केले आहे.
एक संवेदनशील कवी आणि चित्रकार म्हणून वाशीम येथील रा. मु. पगार हे प्रसिध्द आहेत. त्यांचा काव्यसंग्रह प्रसिध्द झाला असून या काव्यसंग्रहाला राज्यातील नामांकित पुरस्कारही प्राप्त झालेत. विदर्भ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी होरपळतो आहे. पगार यांनी जगाच्या पोशिंद्याच्या व्यथा चित्रातून साकारायला सुरुवात केली. अनेक चित्रकृती झाल्यानंतर जाणकारांनी त्यांना ही चित्रांची प्रदर्शनी एखाद्या नामांकित सभागृहात ठेवण्याचे सुचविले. सभागृहात प्रदर्शन ठेवल्यास बघायला येणारे कोण राहतील ज्यांना शेतीतील जराही जाण नाही. त्यामुळे प्रदर्शनीचे स्थळ शेतीच ठरविले. ‘सल मुक्या रंग व रेषांची एक वास्तव....’ या शिर्षकाखाली रा. मु. पगार यांची चित्र प्रदर्शनी २८ व २९ एप्रिल असे दोन दिवस राजस्थान आर्य महाविद्याालयाच्या शेजारी असणाऱ्या रावले यांच्या शेतात भरविण्यात येणार आहे. या चित्र प्रदर्शनीचे उदघाटन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होत असून आहे. कार्यक्रमाला डॉ. रवी जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहील. हे चित्र प्रदर्शन २८ व २९ एप्रिल असे दोन दिवस सकाळी ११ ते रात्री ६ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे.