मालेगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या ३० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यापैकी दोन ग्रामपंचायती अविरोध झाल्या. त्यामुळे २८ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. या २८ ग्रामपंचायतींमधील २२६ जागांसाठी ५६२ उमेदवार रिंगणात होते. यात अटीतटीच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनेकांनी कंबर कसली आणि मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी परगावी गेलेल्या मतदारानांही बोलवण्यात आले होते. मतदान प्रतिनिधी आणि उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी जास्तीत जास्त मतदान कसे होईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले होते. आता तालुक्यातील जऊळका, किन्हीराजा, मेडशी, शिरपूर या चार मोठ्या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून आहे. स्मार्ट ग्राम ढोरखेडा ग्रामपंचायतमधील निवडणूकही राजकीय पदाधिकाऱ्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जात असल्याने या ग्रामपंचायतीकडेही अनेकांचे लक्ष आहे. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रवी काळे यांच्या देखरेखीखाली मतमाेजणी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तहसील कार्यालयात होणारी ही मतमोजणी एकूण १५ टेबलावर होणार आहे . तर यासाठी एका टेबलवर प्रत्येकी ३ अधिकारी याप्रमाणे ४५ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण ८ फेरीत मतमोजणी प्रक्रिया पार पडल्या जाणार आहे.
मालेगाव तालुक्यातील अटीतटींच्या लढतींचे चित्र होणार स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:36 AM