मानोरा: देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवीचा विकास करण्यासाठी ७३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पोहरादेवी येथील कार्यक्रमात दिली. यामुळे पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेतरविवारी मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी येथे ‘तम काळजी मत कर, विकास वे जाव छ’ या बंजारा भाषेतील वाक्य भाषणाच्या सुरुवातीला वापरून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. बंजारा समाजाचा इतिहास मोठा आहे, त्यांची भाषा व संस्कृती एकच आहे. ना. संजय राठोड व आ. राजेंद्र पाटणी यांनी ज्या पोहरादेवी व बंजारा समाजाच्या विकासाच्या संकल्पना विशद केल्या. त्या सर्व समस्या व विकास हा मुख्यमंत्री या नात्याने आपण पूर्ण करणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. यामुळे समाजबांधवांच्या आशा पल्लवित झाल्या असून जगाच्या नकाशावर पोहरादेवी एक सर्वसमावेशक तीर्थक्षेत्र व पर्यटनक्षेत्र म्हणून उदयाला येईल, अशी अपेक्षा समाजाबांधवांमधून व्यक्त होत आहे. या आराखड्यामध्ये बंजारा समाजाचे सण, उत्सव, सेवालाल महाराजांचे प्रसंग, त्यांच्या जीवनामधला क्षण यांची संपूर्ण माहिती असणार आहे. हा संपूर्ण आराखडा एका निश्चित कालावधीत पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे समाजबांधवांमधून समाधान व्यक्त झाले. कार्यक्रमाला बाबुसिंग महाराज, बलदेव महाराज, सेवानिवृत्त न्यायाधीश गोविंद राठोड, शंकर पवार, डॉ. श्याम जाधव, जयकिसन राठोड, जितेंद्र महाराज, एस.डी. राठोड, संजय महाराज, राहुल महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संस्थान विकासाबाबत सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या कार्याचा गौरवपोहरादेवी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन असलेले कार्यतत्पर आमदार म्हणून राजेंद्र पाटणी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. पालकमंत्री संजय राठोड आणि आमदार पाटणी यांच्यात असलेल्या विकास कामांच्या तळमळीतून तयार झालेल्या पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात कोणतीही उणीव दिसून आली नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. कारंजा व मानोरा तालुक्यात सिंचनाची सुविधा म्हणून पाटणी यांनी सिंचन विहिरींबाबत आपल्याकडे पाठपुरावा केला. याची दखल म्हणून तीन हजार सिंचन विहिरींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करा, तातडीने मान्यता दिली जाईल, असे निर्देश आजच जिल्हाधिकाऱ्यांना देत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे भाविकांच्या आशा पल्लवित
By admin | Published: April 04, 2017 1:09 AM