वाशिम : मानोरा तालुक्यातील पोहरादेवी - उमरी परिसरातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी विकासकामांचा प्रत्यक्ष पायाभरणी कार्यक्रम २४ सप्टेंबरला संत सेवालाल महाराज मंदिर परिसर पोहरादेवी येथे संत-महतांसह मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड होते. यावेळी व्यासपीठावर कर्नाटकचे विधानसभा उपाध्यक्ष रुद्रप्पा लभाणी, धर्मगुरू संत बाबुसिंग महाराज, कबीरदास महाराज, माजी आमदार अनंतकुमार पाटील, आमदार राजेंद्र पाटणी, निलय नाईक, इंद्रनील नाईक, राजेश राठोड, खासदार उमेश जाधव, जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सुनील महाराज, यशवंत महाराज, जितेंद्र महाराज, रायसिंग महाराज, शेखर महाराज, माजी मंत्री अमरसिंग तिलावत, माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड, शंकर पवार, आदींची उपस्थिती होती. यावेळी पोहरादेवी-उमरी परिसरातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी विकासकामांचा प्रत्यक्ष पायाभरणी कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी ना. संजय राठोड म्हणाले की, राष्ट्रीय संत डॉ. रामराव महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात स्वतःसाठी कधी काही मागितले नाही. ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजाला आरक्षण मिळावे व पोहरादेवी-उमरी येथील तीर्थक्षेत्र विकास व्हावा यासाठी ते झटले. त्यांची स्वप्नपूर्ती करण्याचा प्रयत्न करणार, अशी ग्वाही संजय राठोड यांनी दिली. यावेळी मान्यवरांनी विचार व्यक्त केले.