वाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता न देण्यासाठी कोकलगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे प्रशासनाने ९ मार्च रोजी तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये पाईपलाइन अंथरण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला.
जिल्हयातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कुठल्याच बॅरेजेसमधून वाशिम शहराला पाणी सोडू नये, या मागणीसाठी बॅरेजेस परिसरात वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांनी वाघोली फाट्यावर बेमुदत उपोषण केले हाते. दरम्यान, २१ फेब्रुवारीला उपोषणकर्त्यांसह इतर हजारो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. शेतीला सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळावे आणि शेतकऱ्यांना बारमाही पिके घेता येणे शक्य व्हावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाने पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारले आहेत. असे असताना बॅरेजेस परिसरातील नागरिकांशी चर्चा न करता वाशिम शहराला बॅरेजेसमधून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. असा आरोप कोकलगाव परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यां कडे केला होता. बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पुरविणे अन्यायकारक असून वाशिमला न देण्यासाठी तिव्र विरोध वाढला होता.
या विरोधामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी वाशिम शहर तातडीची पाणी पुरवठा योजना अंतर्गत पैनगंगा नदीवरील कोकलगाव बॅरेज ते एकबुर्जी धरणापर्यंत पाइपलाइन टाकण्याकरीता पोलीस अधिक्षकांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. यासाठी पोलीस अधिक्षकांनी ५ पोलीस अधिकारी, ४५ पोलीस कर्मचारी , १३ महिला कर्मचारी व एक आरसीपी प्लाटूनच असा तगडा बंदोबस्त कामाच्या ठिकाणी तैनात केला आहे. पोलीसांच्या बंदोबस्तामध्ये पाइपलाइनच्या कामाला शक्रवारला प्रारंभ झाला असून कोणत्याही प्रकारचा त्याठिकाणी अनुचीत प्रकार घडला नसल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.