राजुरा गावात पाणीटंचाई आणि उन्हाळ्याच्या दिवसात गावात टँकर हे समीकरण गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून कायम आहे. राजुरा गाव परिसरातील छोट्या मोठ्या नदी नाल्यांवर सिंचन, पाझर तथा गावतलाव होण्यास मोठा वाव आहे; मात्र सक्षम राजकीय नेतृत्व व प्रबळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे आजवर हा प्रश्न निकाली निघालेला नाही. गाव परिसरात जलसंधारणाची कोणतीच कामे झालेली नाहीत, त्यामुळे पावसाळ्याचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते. परिणामी, भूजल पातळी कमालीची खोल गेली आहे.
गावात ५०० फुटावर कुपनलिका घेऊनही पाण्याचा थेंबदेखील उपलब्ध होत नसल्याने अलीकडे गावात कुपनलिका घेण्यास कोणीच धजावत नसल्याचे चित्र आहे. गावातील जनतेची तहान कायमस्वरूपी भागविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभाताई घुगे यांनी शासनदरबारी वजन खर्ची घालून मुख्यमंत्री पेयजल योजनेतून करोडो रुपयांची पाणी पुरवठा योजना गावासाठी मंजूर करून घेतली. सदर योजनेचे काम गत वर्षभरापासून सुरू असून, अंतिम टप्प्यात आले आहे. ही योजना पूर्ण झाल्यास जनतेची कायमस्वरूपी समस्या निकाली निघणार आहे. सद्य:स्थितीत मात्र नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असून, गावात टँकरद्वारा पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे.
.................
कोट :
राजुरा येथे यंदाही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून टँकरचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तहसीलकडे पाठविण्यात आला आहे. वरिष्ठांनी लवकर गावात टँकरद्वारा पाणी पुरवठा करण्याची गरज आहे.
- आरती प्रकाश बोरजे
ग्रा.पं.सदस्य, राजुरा.