वाशिम : पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली पार्टी असून, ती जिवंत राहिली तर वैचारिक चळवळीतून बाबासाहेबही जिवंत राहतील. या माध्यमातून समाजातील दीनदुबळ्यांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. स्थानिक विश्रामगृहात १४ सप्टेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपाळराव आटोटे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, मराठवाडा अध्यक्ष गणेशराव पडघान, कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे, महामंत्री सरकार इंगोले, विलास राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. कवाडे यावेळी म्हणाले की, कार्यकर्त्यांनी जनतेची कामे करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे, सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या कार्याची जनजागृती करायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.
.........................
...तर सरकारची साथ सोडू- जयदीप कवाडे
विद्यमान सरकार हे दलित व दीनदुबळ्यांवर अन्याय करीत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर, आम्ही विरोधकांशी देखील हातमिळवणी करण्यास मागे-पुढे पाहणार नाही. ज्याप्रमाणे भीमा कोरेगाव लढाईत न्याय व हक्कासाठी इंग्रजांना साथ देऊन अन्याय, अत्याचार दूर करून घेतले, त्याचप्रमाणे सरकारची साथ सोडून देण्याची तयारी करू, असे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी यावेळी जाहीर केले.