लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षी मार्च ते जून या महिन्यांमध्ये लग्नकार्यांची अक्षरश: धूम असते. यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची मंगल कार्यालये गर्दीने गजबजून गेलेली असतात. यंदा मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून २५ मार्चपासून ३ मे पर्यंत ‘लॉक डाऊन’ करण्यात आला. परिणामी, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये होणारे लग्नकार्य देखील रद्द झाले आहेत. अनेकांनी दिवाळीनंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये लग्नाची तारीख काढून मंगल कार्यालये बुक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाशिम येथील स्वागत लॉन मंगल कार्यालयाचे संचालक सुरेश लोध यांनी सांगितले, की एप्रिल महिन्यात त्यांच्याकडे लग्नकार्यासाठी सहा लोकांनी अॅडव्हान्स रक्कम देऊन मंगल कार्यालय बुक केले; मात्र ‘लॉक डाऊन’मुळे एकही लग्न होऊ शकले नाही. मे महिन्यात लग्नकार्यासाठी ११ जणांनी मंगल कार्यालय बुक केले आहे; परंतु या महिन्यातही लग्नकार्य पार पडणार किंवा नाही, याबाबत अनिश्चितता असल्याने अनेकांनी नियोजित तारीख रद्द करून दिवाळीनंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२० या महिन्यांमधील तारीख बुक केल्याचे लोध यांनी सांगितले. वाजंत्री, स्वयंपाकी, फटाके विक्रेत्यांवरही ‘संक्रांत’!लग्नकार्यांमुळे बॅन्डपथक, डी.जे., स्वयंपाकी, फटाके विक्रेत्यांनाही सुगीचे दिवस प्राप्त होतात. यंदा मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गाचे बिकट संकट उभे ठाकले असून त्यास प्रतिबंध करण्यासाठी ३ मे पर्यंत ‘लॉक डाऊन’ करण्यात आला. परिणामी, तारीख निश्चित झाल्यानंतर लग्नकार्यच रद्द झाल्याने वाजंत्री, स्वयंपाकी, फटाके विक्रेत्यांसोबतच या व्यवसायांवर विसंबून असलेल्या हजारो लोकांच्या रोजगारावर ‘संक्रांत’ ओढवली आहे.‘लॉक डाऊन’चा मोठा परिणाम सराफा मार्केट आणि कपडा मार्केटलाही बसला आहे. प्रामुख्याने मार्च ते जून या चार महिन्यांमधील लग्नसराईच्या हंगामात सराफा मार्केट आणि कपडा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते; मात्र सद्या हे दोन्ही व्यवसाय पूर्णत: ठप्प झाले आहेत.
एप्रिल, मे महिन्यात नियोजित विवाह पुढे ढकलले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 11:39 AM