लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी २०१९ च्या पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लावण्यात येणार असून या त्याचे जिल्हानिहाय, यंत्रणानिहाय आणि ग्रामपंचायतनिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने जय्यत नियोजन केले जात असून जिल्हाभरात मोठमोठे फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग्ज लावून युद्धस्तरावर जनजागृती केली जात असल्याचे दिसून येत आहे.१ जुलै २०१६ रोजी २ कोटी ८२ लाख वृक्ष लावण्यात शासनाला यश मिळाल्यानंतर पुढील तीन वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला. त्यानुषंगाने १ जुलै ते ७ जुलै २०१७ या कालावधीतील पहिल्या आणि २०१८ च्या पावसाळ्यातील दुसºया टप्प्यात कोट्यवधी वृक्षांची लागवड झाली. ५० कोटी वृक्षलागवडीतील तिसरा टप्पा ३३ कोटी वृक्षलागवडीचा असून जिल्हास्तरावर वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि वन विकास महामंडळासह ग्रामपंचायती व इतर यंत्रणांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरम्यान, वृक्षलागवडीची पुर्वतयारी म्हणून ‘लॅण्ड बँक’ निश्चित करणे, रोपांची निर्मिती, लोकसहभागाच्या आराखड्याची निश्चिती आदी कामे सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी एस.व्ही. नांदुरकर यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यात ३३ कोटी वृक्षलागवडीचे नियोजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 6:27 PM