लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनचा मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात दीड कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन असून, त्या अनुषंगाने कामांचे अंदाजपत्रक बनवून तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या.दवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना हिवाळ्यापासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे होण्यासाठी शासन, प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाची अधिकाधिक कामे पूर्ण करून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. भारतीय जैन संघटना जलसंधारणाच्या कामासाठी मोफत जेसीबी व पोकलेन मशीन उपलब्ध करून देणार आहे तर यासाठी लागणारे डीझेल शासनामार्फत पुरविले जाणार आहे. जिल्ह्यात सुमारे दिड कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे प्रस्तावित आहे. हे काम १५ जून २०१९ पूर्वी पूर्ण होण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी नियोजनबध्द काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तलावांमधील गाळ काढण्यासोबतच नाला खोलीकरण, मोठी तळी यासारखी कामे केली जाणार आहेत. संबंधित यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे. क्षेत्रभेटी देवून प्रत्यक्ष पाहणीद्वारे कामाची निवड, त्याचा आराखडा तयार करून कामांचे अंदाजपत्रक बनवून तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना डवले यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या. जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या या कामांमध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून सदर अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
दीड कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 1:57 PM
वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे जिल्ह्यात सुमारे दिड कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे प्रस्तावित आहे. संबंधित यंत्रणांनी नियोजनबध्द काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.