वाशिम : कोरोनामुळे गत सव्वा वर्षापासून बंद असलेल्या शाळा यंदा २८ जूनपासून सुरू करण्याचे नियोजन असून, यासंदर्भात शिक्षण संचालकांचे पत्र विदर्भातील शिक्षणाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. दुसरीकडे कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती आटोक्यात आली नाही तर शाळांची घंटा उशिरादेखील वाजू शकते.
गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर २३ नोव्हेंबरला नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले होते. त्यानंतर जानेवारी २०२१मध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. परंतु, कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्वच शाळांचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंद झाले. कोरोनामुळे पहिली ते दहावीच्या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या. दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यात आले. विदर्भात दरवर्षी २६ जूनपासून शैक्षणिक सत्राला प्रारंभ होत असतो. यंदा सध्या कोरोनाचे संकट आहे. जून महिन्यापर्यंत कोरोनाची दुसरी लाट ओसरले, असे गृहीत धरून शिक्षण संचालकांनी विदर्भातील शाळा २८ जूनपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. याचबरोबर कोरोना विषाणू संसर्गाचे संकट कायम असल्यास शाळा सुरू करण्याचे नियोजन आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
०००
शाळा सुरू करण्याचे नियोजन.. (शिक्षणाधिकारी म्हणतात...)
विदर्भात २६ जूनपासून शाळा सुरू होत असतात. यंदा २६ जूनला शनिवार असल्याने सोमवार, २८ जूनपासून शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्याबाबत शिक्षण संचालकांच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे वाशिमचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी सांगितले.
००००
विद्यार्थी, पालक, शिक्षकही शाळेसाठी उत्सुक !
कोट
गेल्या वर्षीपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे घरात राहून कंटाळा आलेला आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण मिळाले. परंतु वर्गातील शिक्षणाची मज्जा काही औरच असते. त्यामुळे शाळा कधी सुरू होतात, याची उत्सुकता लागून आहे.
- शौर्या विवेक साबू,
विद्यार्थी
.......
कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असल्या तरी प्रशासकीय कामकाजासाठी शाळा सुरूच होत्या. ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण प्रणालीत खूप फरक आहे. कोरोनाचे संकट कमी झाल्यास नियोजित वेळेत शाळा सुरू व्हाव्यात.
- विजय मनवर
शिक्षक
........
वर्षभर शाळा बंद असल्याने विद्यार्थीदेखील कंटाळले आहेत. शाळेतील शैक्षणिक वातावरण चांगले असते. कोरोनाचे संकट ओसरले, तर शाळा सुरू करण्यास काही हरकत नाही.
- हुकूम पाटील तुर्के,
पालक
००००००
कोरोनाचे संकट कायम असल्यास ऑनलाईन शिक्षण
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यास २८ जूनपासून शाळा सुरू होतील, असा अंदाज आहे. शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात शिक्षण मिळणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट कायम राहिल्यास गतवर्षीप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
०००००००००००००