संतोष वानखडे, वाशिम : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने "होऊ द्या चर्चा" अभियानाचा दुसरा टप्पा वाशिम जिल्ह्यात वाशिम येथून १ आॅक्टोबरपासून सुरू झाला असून, पहिल्याच दिवशी शिवसैनिकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या काही योजनांची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या फसव्या योजनांचा भंडाफोड करण्यासाठी "होऊ द्या चर्चा" अभियान वाशिम जिल्ह्यात १ ते १० आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख डाॅ. सुधीर कवर यांनी रविवारी दिली. सर्वसामान्य शेतकरी, कामगार, व्यापारी व सर्वसामान्य वर्गात या सरकारबद्दल प्रचंड नाराजी असून जनता नाखूष आहे, याला वाचा फोडण्यासाठी पक्षातर्फे विधानसभा निहाय जबाबदाऱ्या देण्यात आल्याचेही डाॅ. कवर म्हणाले. प्रचंड महागाई, बेरोजगारी व सत्ताधाऱ्यांच्या खोट्या आश्वासनाला जनता हैराण झाल्याचा आरोपही शिवसैनिकांनी केला. यावेळी जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कवर, जिल्हा समन्वक सुरेश मापारी, प्रमुख वक्ते शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, जिल्हा संपर्कप्रमुख दिलीपराव जाधव, माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, जिल्हा संघटक गजानन देशमुख, सहसंघटक सुधीर विल्हेवार यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.
महागाई, बेरोजगारीवरून साधणार निशाना!
महागाइने सर्वसामान्य जनता होरपळून जात आहे. हाताला काम नसल्याने युवकांमध्ये नैराश्य पसरत आहे, खासगीकरण व कंत्राटीकरणामुळे युवकांमध्ये प्रचंड संताप असून, "होऊ द्या चर्चा"अभियानातून या संतापाला वाट मोकळी करून दिली जाणार आहे असे सांगून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा भंडाफोड केल्याशिवाय राहणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी मांडली.