लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : सामाजिक बांधीलकी म्हणून नववधू-वराने लग्न लावण्याआधी शासनाच्या उपक्रमात सहभाग नोंदवून ग्रामपंचायतच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होत वृक्षारोपण केले. तसेच वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. कारखेडा येथील ग्रामदैवत शंकरगीर महाराज सभागृहात ६ जून रोजी कारखेडा येथील रमेशराव देशमुख यांची कन्या सोनल व कामरगाव येथील वीरेंद्र केशवराव देशमुख यांचा आदर्श विवाह संपन्न झाला. सोनल व वीरेंद्र यांनी लग्न समारंभाच्या आणि जि.प.शाळेच्या आवारात वृक्ष लागवड केली. यावेळी कारखेडाचे सरपंच भानू जाधव, उपसरपंच जयश्री गणेश बावणे, ग्रामसेवक एकनाथ चिकटे, यांनी गावाच्या लोकसंख्येएवढी झाडे लावण्याचा संकल्प केला. प्रमुख रस्त्याच्या दुतर्फा व स्मशानभूमी परिसर, शंकरगीर महाराज मंदिर, जिल्हा परिषद शाळा, के.एल. विद्यालय परिसरात झाडे लावण्यास सुरुवात झाली. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ही झाडे लागणार आहे. त्यांनी लावलेली झाडे आगामी तीन वर्षांसाठी जगविण्याचा संकल्पसुद्धा करण्यात आला. यावेळी शंकरगीर महाराज संस्थानचे अध्यक्ष योगेंद्र देशमुख, उपाध्यक्ष प्रभाकर भोयर, मुख्याध्यापक भागवत कोरे, महेंद्र चव्हाण, सतीश मठदेवरु, गोविंद पोतदार, ग्रा.पं. सदस्य प्रशांत देशमुख, उमा किशोर चव्हाण, पोलीस पाटील वासुदेव सोनोने, सुलोचना खेरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन गावंडे, प्रल्हाद शिकारे यांची उपस्थिती होती.
बोहल्यावर चढण्यापूर्वी नववधू-वरांचे वृक्षारोपण!
By admin | Published: July 08, 2017 1:34 AM