लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वृक्षांचे प्रमाण कमी होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. या पृष्ठभूमीवर राज्यात चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. वाशिम जिल्ह्यात १ जुलैपासून सुरू झालेल्या वृक्षारोपण सप्ताहाची सांगता ७ जुलै रोजी होणार आहे.वाशिम जिल्ह्यात पाच लाखांवर वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. १ जुलैपासून विविध शासकीय-निमशासकीय कार्यालये तसेच स्वयंसेवी संस्थेमार्फत वृक्षारोपण केले जात आहे. ४ जुलैपर्यंत ४ लाख २० हजारांवर वृक्षारोपण झाले आहे. ७ जुलैपर्यंत उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षारोपण करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला. प्रत्येकाने ७ जुलैपर्यंत किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा निश्चय करावा. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक असून, त्यासाठी प्रत्येकाच्या कृतिशील प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण, वन विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पाटबंधारे विभाग, शिक्षणाधिकारी कार्यालय यासह निमशासकीय कार्यालये व स्वयंसेवी संघटनेमार्फत वृक्षारोपण केले जात आहे. ७ जुलैपर्यंत ही मोहीम असून, त्यानंतरही स्वेच्छेने वृक्षारोपण करता येणार आहे.वाशिम तालुक्यातील काटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण कार्यक्रमाला सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. तसेच स्थानिक नालंदानगर येथील त्रिरत्न बुद्ध विहारात १९ जूनपासून धम्मसंस्कार वर्ग सुरु करण्यात आले आहेत.या धम्मसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांच्या हस्ते २ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. भंते अश्वजित यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला पिंपळ, बोधीवृक्ष, निंब व सिरसम या रोपांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भन्ते यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी बहुसंख्य गावकरी मंडळीची उपस्थिती होती.
वृक्षारोपण सप्ताहाचा उद्या समारोप
By admin | Published: July 06, 2017 12:38 AM