मानवी जीवनात वनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाढत्या लोकसंख्येला शुद्ध प्राणवायू मिळण्यासाठी वनांशिवाय तरणोपाय नाही, हे कोरोना महामारीमध्ये अधोरेखित झाले आहे. तालुक्यात बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय असमतोलाचा फटका नागरिकांना बसत आहे. वनविभागाच्या काही ठिकाणच्या जमिनीवर अनेक नागरिकांनी बेकायदेशीर ताबाही मिळविला आहे. वनांचे व पर्यायाने वृक्षांची संख्या दिवसेंदिवस घटत असताना, तालुक्यातील कारखेडा या गावातील शासकीय जमिनीवर तब्बल दोन हजार आठशे आंबा, आवळा, चिंच, जांभूळ ही फळझाडे व इतरही बहुगुणी औषधी वृक्षांचे रोपण सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश बाळापुरे यांच्या मार्गदर्शनात सहायक लागवड अधिकारी विजय चतूरकर यांच्या देखरेखीखाली ११ जुलैपासून करण्यात येत आहे.
००००
जाॅब कार्डधारकांना रोजगारही मिळतोय
रोजगार हमी योजनेंतर्गत जवळपास दहा एकर शासकीय जमिनीमध्ये वृक्षलागवड करण्यात येत असल्याने, कोरोनाच्या कालावधीमध्ये कारखेडा गावातील जॉब कार्डधारक गरजू नागरिकांना रोजगारही उपलब्ध झालेला आहे. यामुळे रोजगारांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.