लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वृक्षांचे प्रमाण कमी होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. वाशिम जिल्ह्यात १ जुलैपासून सात दिवस वृक्षारोपण हा सप्ताह सात दिवस चालणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एका बैठकीत दिली.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, विभागीय वन अधिकारी के. आर. राठोड, सहायक वन संरक्षक आर. बी. गवई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, लघुपाटबंधारे विभागचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांच्यासह सर्व तहसीलदार, शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, वृक्षारोपण मोहिमेच्या निमित्ताने पर्यावरण रक्षणास हातभार लावण्याची संधी प्रत्येकाला मिळत आहे. या संधीचा फायदा घेऊन प्रत्येकाने ७ जुलै २०१७ पर्यंत किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा निश्चय करावा. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक असून, त्यासाठी प्रत्येकाच्या कृतिशील प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊन आपले योगदान द्यावे. गतवर्षी कारंजा तालुक्यातील भामदेवी व मंगरूळपीर तालुक्यातील पारवा येथील ग्रामस्थांनी वृक्ष लागवड मोहिमेत चांगली कामगिरी केली होती. तसेच येथील झाडांचे संवर्धनही चांगल्या पद्धतीने झाले आहे. इतर गावांतील ग्रामस्थांनीही वृक्ष लागवडीमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
सात दिवस चालणार वृक्षारोपण
By admin | Published: July 03, 2017 2:30 AM