समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी गावांत जलसंधारण व मृदा संधारणाची कामे केली जात आहेत. या स्पर्धेत सहभागी मंगरूळपीर आणि कारंजा तालुक्यातील प्रत्येक गावात हा उपक्रम पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनात राबविला जात आहे. मृदा संधारणासह जलस्रोतांचे सौंदर्यीकरण असा दुहेरी हेतू यातून साधला जाणार आहे. याअंतर्गत कारंजा लाड तालुक्यातील जानोरी या गावातही श्रमदानातून खोदलेल्या शेततळ्यावर व बांधावर स्वातंत्र्यदिनानिमित्त बांबूच्या रोपांची लागवड करण्यात आली. उन्हाळ्यात गावकऱ्यांनी नरेगाच्या माध्यमातून श्रमदान करीत १५ चौरस मीटर लांब, रुंद आणि ३ मीटर खोल असलेल्या शेततळ्याचे खोदकाम केले होते. गावकऱ्यांनी केलेल्या श्रमाचे फलित झाले व हे शेततळे आता काठोकाठ भरले आहे.
----------------
जलमित्रांसह महिलांचा सहभाग
श्रमदानातून खोदलेल्या शेततळ्याच्या काठावर चहूबाजूंनी बांबूची लागवड करण्यासाठी गावातील जलमित्र, महिला मंडळांनी उत्साहाने सहभाग घेतला. गावाने एकूण १२५० बांबूरोपांची लागवड केली आहे. या बांबू लागवडप्रसंगी गावच्या सर्व जलमित्रांसह मास्टर ट्रेनर सुमित गोरले हेसुद्धा उपस्थित होते.