जिल्ह्यात पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत कारंजा आणि मंगरुळपीर या दोन तालुक्यांतील ४३ ग्रामपंचायतींत विविध कामे केली जात आहेत. यात जलसंधारण, मृद संधारणासह, वृक्ष लागवड या प्रमुख कामांचा समावेश आहे. यातील बहुतांश कामे लोकसहभागातून केली जात असली तरी काही कामे प्रशासनाच्या सहकार्यातूनही केली जात आहेत. आता पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सहभागी ४३ ग्रामपंचायतींत बिहार पॅटर्नच्या धर्तीवर वृक्ष लागवड करून त्या वृक्षांचे संवर्धन गावकऱ्यांकडून केले जाणार आहे. यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्षरोप उपलब्ध केली जाणार आहेत.
---------------
या गावांत होणार वृक्ष लागवड
कारंजा तालुका (२४) : जानोरी, विळेगाव, अंतरखेडा, जामठी, बेलमंडळ, पोहा, उंबर्डा बाजार, काकड शिवणी, शिवनगर, दोनद, गायवळ, नारेगाव, बेलमंडळ, शेलूवाडा, धोत्रा देशमुख, धोत्रा जहॉगीर, शिवण, पिंपळगाव, बांबर्डा, बेलखेडा, शहादतपूर, आखतवाडा, पिंप्री मोडक, रामनगर.
०००००००००००००
मंगरुळपीर तालुका (१९) : लखमापूर, बोरव्हा, शेंदुरजना मोरे, सायखेडा, घोटा, स्वासीन, जांब, पिंप्री खु, चिंचाळा, लाठी, पिंपळखुटा, शेलगाव, तपोवन, नागी, पिंप्री (अवगन), उमरी बु., जनुना, जाेगलदरी, पारवा.
---------------
रोहयोतून मजुरांच्या हाताला काम
पानी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत बिहार पॅटर्नच्या धर्तीवर वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धन करणे हाच उद्देश नाही, तर या माध्यमातून मजुरांच्या हाताला कामही दिले जाणार आहे. रोहयोच्या माध्यमातून किमान पाच मजुरांच्या आधारे ४३ ग्रामपंचायतींत ही वृक्ष लागवड केली जाणार आहे. वृक्ष लागवडीनंतर याच कामगारांना या वृक्षांच्या संगोपन आणि संवर्धनाचे कामही दिले जाणार आहे.
००००००००००००००००
काय आहे बिहार पॅटर्न
धुळे जिल्ह्यातील बिहारी नावाच्या एका गरीब शेतकऱ्याने राबविलेला वृक्ष लागवडीसह संगोपन, संरक्षणाचा प्रकल्प यशस्वी ठरला. त्यामुळे लावलेली झाडे जगविता येऊ शकतात. त्याचे सरंक्षण होऊ शकते, हा विश्वास व्यक्त झाला. त्या व्यक्तीच्या नावावरूनच त्या संकल्पनेला अर्थात वृक्ष लागवड, संगोपन आणि संरक्षणाच्या पॅटर्नला ‘बिहार पॅटर्न’ असे नामकरण केले गेले. ‘बिहार पॅटर्न’ हा प्रयोग राज्यात २००८ पासून राबविला जात आहे.
०००००००००००००००००००००००
कोट:
समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी गावांचा सर्वांगीण विकास हेच पानी फाउंडेशन स्पर्धेमागील उद्दिष्ट आहे. वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धन आणि त्यातून दीर्घकाळ मजुरांच्या हाताला काम, याच उद्देशाने सहभागी ४३ गावांत बिहार पॅटर्नच्या धर्तीवर वृक्ष लागवड केली जाणार आहे.
-सुभाष नानवटे,
जिल्हा समन्वयक, पानी फाउंडेशन