लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वातावरणातील बदल, पर्यावरणाचा ऱ्हास, बदललेले ऋतुचक्र यासह तत्सम बाबींसाठी गत काही वर्षांत झपाट्याने झालेली वृक्षतोड प्रामुख्याने कारणीभूत ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच याप्रती जागरूकता वाढली असून, शासन-प्रशासनासह नागरिकांमधूनही वृक्ष लागवडीला प्रथम प्राधान्याने प्रोत्साहन दिले जात आहे. वृक्षांशी जिव्हाळा असलेल्या वाशिममधील करांगळे कुटुंबीयांनी तर, वृक्ष लागवडीपूर्वी रोपट्यांची सहकुटुंब मनोभावे पूजा-अर्चा करून ह्यवृक्ष हेची ईश्वरह्णचा संदेश दिला आहे. १ ते ७ जुलै या कालावधीत संपूर्ण देशभरात वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला जात आहे. राज्य शासनाकडून चार कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले असून, वाशिम जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सप्ताहभरात ५ लाख ८ हजार वृक्षांची प्रत्यक्षात लागवड केली जाणार आहे. दरम्यान, या मोहिमेत आपलाही खारीचा वाटा असावा, या हेतूने वाशिम येथील स्वराज कॉलनीमध्ये वास्तव्यास असलेल्या वैशाली अरविंद करांगळे यांनी आपल्या कुटुंबीयासह कॉलनीमध्ये वास्तव्यास असलेल्या इतर सर्व कुटुंबांना एकत्र करून १ जुलै रोजी सकाळी रोपट्यांच्या पूजेचा कार्यक्रम आयोजित केला. रोपट्यांना हळदी-कुंकू लावून आणि नंतर आरती म्हणून विधिवत पूजा आटोपल्यानंतर सर्व रोपट्यांची लागवड करण्यात आली.
वृक्ष लागवडीपूर्वी रोपट्यांची सहकुटुंब पूजा!
By admin | Published: July 02, 2017 8:58 AM