वाशिम: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)काही गाड्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. भंगार झालेल्या या गाड्यांचे निखळलेले सुटे भाग जोडण्यासाठी वाहक, चालक चक्क प्लास्टिक दोरीचा वापर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळात आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी शिवशाही, शिवनेरीसह इतर अद्ययावत बसगाड्या सुरू केल्या; परंतु पूर्वी विविध आगारात उपलब्ध असलेल्या बसगाड्यांची अवस्था वाईट असताना त्या बदलण्याची तसदी मात्र घेतली नाही.
वाशिम जिल्ह्यातच अशा ब-याच नादुरुस्त बसगाड्या मार्गावर धावत आहेत. काही वेळा या बसगाड्यामध्येच बंद पडत असल्याने खोळंबा होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. काही बसगाड्यातील आसनांसह इतर सुटे भाग जीर्ण झाल्याने प्रवाशांना त्याचाही त्रास सहन करावा लागतो. बुधवारी जिल्ह्यातून धावणारी वाशिम-अमरावती या बस फेरीच्या रेडीएटरची जीर्ण झालेली जाळी जोडण्यासाठी चालक, वाहकांनी चक्क प्लास्टिक दोरीचा आधार घेतल्याचे पाहायला मिळाले. चालक, वाहकांसह प्रवाशांना होत असलेला हा त्रास लक्षात घेऊन एसटी महामंडळाने जीर्ण बसगाड्या बदलाव्यात, अशी मागणी प्रवासी वर्ग करीत आहे.